Wednesday, June 19, 2024

*‘खंडा विवाह’...लोकपरंपरेतील शस्त्रहुंकार!*




            “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत।”..’शूर आम्ही सरदार’ या गाण्यातल्या या प्रसिद्ध ओळी! यातल्या शेवटच्या ओळी या केवळ काव्य नाहीत तर मध्ययुगीन भारतातली प्रचलित प्रथेच्या प्रतिबिंब आहेत. ‘तलवारीशी लगीन’, ही मध्ययुगीन भारतात, विशेषतः उत्तरभारतात प्रचलित असणारी एक अनोखी प्रथा होती. ही प्रथा ‘खंडा विवाह’ म्हणून ओळखली जाई. जर काही कारणास्तव नवऱ्यामुलाला लग्नासाठी येणे शक्य नसेल, तर त्याच्याऐवजी त्याची तलवार लग्नासाठी पाठवली जाई. अशा तलवारीशी लग्न झालेल्या मुलीला ‘खांडा राणी’ म्हटले जाई. या प्रथेची काही रंजक उदाहरणं आणि लोकपरंपरा आपल्याला मध्ययुगात दिसून येतात. 

           खंडा विवाहाची प्रथा का अस्तित्वात आली असावी? याची अनेक मतमतांतरे आहेत. मध्ययुगीन काळात प्रवास करणे किचकट आणि वेळखाऊ काम होते. राजा किंवा तत्सम वरिष्ठ पदावरचे अधिकारी अधिक काळ राज्याबाहेर / संस्थानाबाहेर राहिल्यास शत्रूंची बंडाळी होण्याची शक्यता अधिक असे, त्यामुळे कदाचित व्यक्तीऐवजी तिची वस्तू पाठवण्याची प्रथा सुरु झाली असावी. राजा किंवा संबंधित व्यक्ती युद्धामध्ये व्यस्त असेल आणि तिथून लग्नाला येणे शक्य नसल्यास नवऱ्यामुलाऐवजी तलवार वापरण्याची प्रथा सुरु झाली असावी. या प्रथेच्या उगमाची कारणे काहीही असली तरी त्यांनी मध्ययुगीन काळात एक बहुपेडी रूप धारण केले होते हे मात्र निश्चित!  

           मराठ्यांच्या इतिहासातले खंडाविवाहाचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इंदौरचे राजे मल्हारराव होळकर यांचा हरकुबाई / हरकुँवर बाई यांच्याशी झालेला विवाह होय. या विवाहाचे नेमके साल ज्ञात नसले तरीही मल्हाररावांनी मध्यप्रदेशमधील बङवानी संस्थानच्या राजाच्या मुलीशी मोहिमांच्या व्यस्ततेमुळे खंडा पाठवून विवाह केल्याच्या आणि त्यांना ‘खांडाराणी’ चा मान दिल्याच्याही नोंदी सापडतात. मध्ययुगातल्या खंडाविवाहाच्या प्रथेबद्दल विखुरलेल्या स्वरूपात काही नोंदी आढळतात. राजस्थानमधली काही कागदपत्रं लग्न ठरल्यावर, मुलामुलीला हळद लागल्यावर मुलासोबत काही दुर्घटना घडून मुलाचा मृत्यू झाला आणि मुलाऐवजी त्याच्या तलवारीशी मुलीचं लग्न लावल्याची नोंद करतात (या कागदपत्रांचं साल साधारण १७५० ते १७८० च्या दरम्यानचे आहे).      

           खंडा / तलवार ही अशा प्रकारच्या विवाहांमध्ये केवळ नवऱ्यामुलाची ‘replacement’ म्हणून वापरली जात होती / असावी असे काही ऐतिहासिक नोंदींमधून वाटत नाही. इसवीसन १८५१ मध्ये जोधपूरचे महाराजा तख्तसिंह यांचा आठवा विवाह जामनगरची राजकन्या प्रतापकँवर जाङेची यांच्याशी ‘खंडा विवाह’ पद्धतीने झाला. विवाहसोहळ्यातले इतर सर्व विधी खंड्यासोबत पार पडले, मात्र फेरे घेताना चार पैकी तीनच फेरे खंड्यासोबत घेतले गेले. उर्वरित एक फेरा तख्तसिंहांनी खंडा वधूला घेऊन परत आल्यानंतर त्याच्यासोबत पूर्ण केल्याची नोंद आहे. मध्ययुगात अशाप्रकारच्या खंडा विवाहांमध्ये तलवारीची भूमिका काहीवेळेस नवऱ्यामुलाची नाही तर ‘मध्यस्था’ ची (mediator) ची असायची का? याचाही शोध घ्यायला हवा!

          खंडा विवाहाचे ऐतिहासिक पैलू जेवढे रोचक आहेत तितकेच त्याच्याशी जोडले गेलेले लोकपरंपरेचे पैलूही रंजक आहेत. एखादी प्रथा अस्तित्वात येते तेव्हा तिचा, घटना - परिणाम ( चांगला अथवा वाईट) - सातत्य आणि कालशृंखला असा प्रवास होत ती एक सुसंबद्ध स्वरूपात आकाराला येते. कालानुरूप त्यावर तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक अंगांची पुटे चढत जातात. खंडा विवाह ही प्रथा मध्ययुगातील काही राजकीय तर बव्हंशी विशिष्ट समाजधारणांचे फलित होती. कुठल्याही प्रथा-परंपरेच्या लोकपरंपरेच्या पैलूंकडे वळलं की वेगवेगळ्या काळात त्या त्या प्रथांबद्दलचा एक ‘Rebellious factor’ नेहमी दिसून येतो. काही प्रथा, परंपरा यांचा तत्कालीन समाजमनाला होणारा जाच किंवा त्यांविरुद्धची बंडखोरी लोकपरंपरांच्या विविध माध्यमांतून (गाणी, लोककथा, लोकनाट्य इ.) अनेकदा प्रतिबिंबित झालेली दिसून येते. खंडा विवाहाची प्रथाही याला अपवाद नव्हती. मध्ययुगीन काळात जेव्हा स्त्रियांचे संपूर्ण अस्तित्व पितृसत्ताक अधिपत्याखाली होते, अशावेळी एखाद्या धडधाकट व्यक्तीऐवजी तलवारीसारख्या वस्तूबरोबर विवाह करण्याची वेळ आल्यावर त्याबद्दल मनामध्ये खदखद वाटणे अगदी साहजिक होते.  खंडा विवाहाबद्दलच्या बंडखोरीची अशीच एक लोककथा राजस्थानमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. 

        ‘मुँहणोत नैणसी’ हे जोधपूरचे महाराजा जसवंतसिंह यांच्या पदरी असणारे इतिहासकार होते. यांना राजस्थानचे आद्य इतिहासकार म्हणूनही ओळखलं जातं. तर ही लोककथा अशी, नैणसी यांचा तिसरा विवाह राजस्थानमधल्या बाङमेरमधल्या दिवाणांच्या मुलीशी निश्चित झाला होता. नैणसी कामामध्ये व्यस्त असल्याने त्यांनी प्रत्यक्ष जाण्याऐवजी खंडा विवाह करावा असा विचार केला आणि त्यानुसार बाङमेरमध्ये आपली तलवार वरातीसकट पाठवून दिली. दिवाणांना मात्र नवऱ्यामुलाने प्रत्यक्ष न येता अशाप्रकारे तलवार पाठवणं अपमानास्पद वाटलं. त्यांनी प्रत्यक्ष विरोध मुळीच दर्शवला नाही..मुलीचं लग्न अगदी साग्रसंगीत खंड्याशी लावून दिलं पण पाठवणीच्या वेळेस मात्र नवऱ्यामुलीऐवजी डोलीमधून नैणसीसाहेबांकडे चक्क एक मुसळ पाठवून दिलं! तुमच्या मुलाऐवजी खंडा चालतो तर आमच्या मुलीऐवजी मुसळ का नाही? अशा ‘rebellious’ विचाराने बाङमेरच्या दिवाणांनी ‘Reverse खंडा विवाह’ लावून दिला! डोलीमधलं मुसळ बघून मुँहणोत नैणसींचा राग अनावर झाला आणि त्यांनी बाङमेरवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये शहर लुटून त्याचे दरवाजे उखडून जालोरच्या किल्ल्यालाही लावले! या हल्ल्याची खोचक लोकगीते आजही राजस्थानमध्ये म्हटली जातात. आता ही घटना खरी की खोटी हा भाग अलाहिदा, पण ही लोककथा पितृसत्ताक समाजव्यवस्था, समाजव्यवस्थांचा दुटप्पीपणा, ठिसूळ पुरुषी अहंकार अशा अनेक पैलूंना अलगद स्पर्श करते!   

        खंडा विवाहाची प्रथा ही  मध्ययुगातल्या काही अत्यंत क्लिष्ट सामाजिक-सांस्कृतिक रचना, धारणा आणि परस्परसंबंध यांकडे निर्देश करते. प्राचीन काळापासून काही विशिष्ट घटना, प्रसंग, व्यक्ती यांसाठी परंपरागत चिन्हे, प्रतीके तयार होत आलेली आहेत.  परंपरागत चालत आलेली ही चिन्हे, प्रतीके काही वेळेस मूळ व्यक्ती, प्रसंग, घटना यांना समांतर म्हणून तर काही वेळेस त्यांच्याऐवजी (replacement) वापरली जात. खंडा विवाह ही प्रथा या दुसऱ्या प्रकारात मोडणारी होती. तलवार शस्त्र युद्धभूमीवर प्रसिद्ध झाले तेव्हापासून जगभर ते शौर्य, पराक्रम, सार्वभौमत्व यांचे प्रतीक बनले. हे शस्त्र हळूहळू योद्धयांची आणि कालांतराने ते शस्त्र म्हणून वापरणाऱ्या संपूर्ण पुरुष जातीचे प्रतीक बनले. नियोजित कार्यामध्ये माणसाला सहकार्य करण्यापासून (म्हणजे अर्थातच युद्ध करणे आणि जीव घेणे) इथपासून ते वापरकर्त्यांच्या मूळ प्रकृतीचा आधार घेत कालांतराने  वापरकर्त्यांची सामाजिक-सांस्कृतिक ओळख (identity trace) बनणे तलवारीला साधले होते. तलवारीचा शस्त्र म्हणून युद्धभूमी ते लग्नाच्या मांडवापर्यंतचा हा सांस्कृतिक प्रवास थक्क करणारा आहे.

      खंडा विवाह ही प्रथा म्हणून आता काळाच्या पडद्याआड गेली आहे, पण त्याच्या पाऊलखुणा आजही काही प्रथांमध्ये झिरपलेल्या दिसून येतात. राजस्थानमधल्या काही लग्नांमध्ये आजही ‘खरग् बंधाई’ म्हणून एक विधी लग्नाआधी केला जातो. यामध्ये लग्नाच्या विधींपूर्वी मुलाच्या शेल्याची गाठ तलवारीशी जोडली जाते. राजपुतांच्या क्षात्रधर्माची आठवण करून देणारा हा विधी आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. मराठा समाजात काही घराण्यांमध्ये मुलांची मुंज ही तलवारीशी लावली जाते. या प्रथा खंडा विवाह प्रथेचेच अवशेष असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही प्रथा नामशेष झाल्या तरीही बोलीभाषांमधून त्या जिवंत राहतात. उदाहरणच द्यायचं तर, एखाद्या धाडसी व्यक्तीच्या कामाबद्दल बोलताना आजही अनेकदा ‘त्याने तलवारीच्या पात्याशीच लग्न लावलं आहे’ असं म्हटलं जातं. मध्ययुगात अस्तित्वात असणाऱ्या प्रथांचे स्मरण अशा वाक्प्रचार, म्हणींमधून होत राहते. 

         भारतीय शस्त्रे ही त्यांना असणाऱ्या सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमीमुळे इतर देशांतील मध्ययुगीन शस्त्रांहून वेगळी ठरतात.  ‘खंडा विवाह’ या प्रथेचे अधिकतर संदर्भ राजपूत, मराठा समाजात आणि इतर काही उत्तर भारतीय भागांमध्येच आढळून येतात. अशाच प्रकारच्या काही प्रथा मध्ययुगीन भारताच्या इतर भागांमध्येही अस्तित्वात होत्या का? याचाही अभ्यास करायला हवा.  भारतासारख्या वैविध्य संपन्न देशातल्या अशा शस्त्रपरंपरांचा विविधांगी अभ्यास येत्या काळात होणे गरजेचे आहे!

The entire information above was shared with me by Anurag Vaidya. 

No comments: